Skip to main content

भाग - १... सफर वैराडगडची..


नुकतेच गडांचा राजा राजगडला अविस्मरणीय भेट देऊन आलो होतो.  आता सर करायचा होता वैराडगड. सातारा, भुईंज पाचवड येथून १५ कि.मी. अंतरावर भक्कम असा गड.  मी, माझे साडू (संभाजी महामुलकर), सागर, शेखर, संतोष आणि मयूर या नवीन मावळ्यांची टीम तयार केली.

२२/९/२०१२  वार शनिवार, साय. ६ वाजता  मी, माझी पत्नी मीना व माझी मुलगी गुड्डी चिपळूण वरून सातारा येथील जावली तालुक्यातील म्हसवे या गावी जाण्यासाठी क्वालीस गाडी सुरु केली. कोकणातील नागमोडी रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा भाताची शेती, पाऊस कमी झालेला तरीही कड्यावरून कोसळणारे धबधबे, ओसंडून वाहणाऱ्या नद्या पाहत गाडी पुढे सरकत होती. गणेशोत्सव असल्याने अधून मधून सार्वजनिक गणपती बापांचे दर्शन होत होते,  अंधार वाढत होता, कुंभार्ली घाट क्रॉस केला, पाटण तालुका सोडला, उंब्रजचा ब्रिज पार करत एक्स्प्रेस वे ला लागलो. बरोबर रात्री ९ वाजता माझ्या सासुरवाडीत दरे करंदी या गावी पोहचलो. माझे साडू,  सागर, शेखर, संतोष आणि मयूर माझी आतुरतेने वाट पाहत होते. घरातील बाप्पाचे व गोरीचे दर्शन घेतले,  ट्रेकिंग ला लागणारे सामान एका बेगेत घेतले, माझ्या एकुलत्या एक बायकोचा निरोप घेउन, म्हसवे या गावी मुक्कामासाठी सासरवाडीतून निघालो.

जावली तालुक्यातील म्हसवे गाव. ऐतिहासिक वारसा लाभलेला, सर्वात मोठे वडाचे झाड, ज्याचा आशियातून दुसरा क्रमांक लागतो, खुद्द ब्रिटीशांनी याची नोंद इतिहासात केली आहे.  हिरव्या गार डोंगरांच्या कुशीत लपलेले छोटेसे गाव. कधीही जा, थंड वातावरण. रात्री ११ वाजता म्हसवे गावातील साडूंच्या घरी आलो, घरातील महिला मंडळ गावातच गौरी गणपतीच्या पारंपारिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. जेवण उरकून आम्ही सुद्धा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो. घरोघरी गणपती असूनही, गावचा सार्वजनिक गणपती होता. १५ फुट बाय १५ फुटचा मंडपात गणपती  बाप्पा विराजमान झालेले. मंडपाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत महिला ब्रिगेड पारंपारिक खेळ करण्यात मग्न होत्या, संगीत खुर्ची संपली. नाच ग गुमा.. कशी मी नाचू.. चालू झाले. गावातील  मातब्बर मंडळी माईक वरून शब्दांचे बाण फेकत कार्यक्रमात रंगत आणत होते. कमरेत पदर खोचून, खेळातील बायका खेळ खेळत होत्या. म्हाताऱ्या बायका खेळात सहभागी नसल्या तरीही, आपल्या अनुभवाच्या आयड्याज त्यांना देत होत्या. म्हातारे बापडे, तंबाखू मळत मळत खेळातील चुकांवर बडबड करीत होते. तरून पोरे जोक्स वर जोक्स करून परिसर हसरे ठेवत होते.  नाच ग गुमा.. संपले. सर्व बायका हसत, लाजत मांडी घालून महिला आरक्षणात बसल्या. माईक वरून नवीन खेळाचा आवाज घुमला, बायकांची निवड झाली, आणि सुरु झाला खेळ, गाणे होते.. वाघ्या रे वाघ्या... नेशील कसा. ७ ते ८ बायका एकमेकीची कंबर पकडून एकीमागे एक उभी राहून उजवीकडून डावीकडे जायच्या, त्यांच्या विरुद्ध दिशेला एक बाई , म्हणजेच ती वाघ. गाण्यावर ताल धरत आपल्या समोर असललेल्या बायकांच्या माळेतील बायकांवर झडप घालून त्यांना आउट करत होती. खेळ मस्तच रंगत चालला होता. मी माझ्या मनाचा संघणक उघडून या सर्व गोष्टी सेव करत होतो.



रात्रीचे १२.३० वाजून गेले होते. थंडी वाढत होती, सकाळी लवकर उठून गडावर जायचे होते. लगेच घरचा रस्ता धरला. मस्त पैकी दोन घोंगड्या अंगावर घेतल्या. झोपलो. सकाळी ८ वाजता सर्वजण तयार झालो. माझी मेव्हणी जयश्री आमच्यासाठी चुलीवर भाकऱ्या करत होती. १५ भाकऱ्या, ६ कांदे, तिळाची चटणी व लाल चटणी एका कापडात बांधून आम्हाला दिली.



(सागर, मी, साडू, शेखर, खाली मयूर व कुत्रा बिगुल)

यावेळेला आमच्या बरोबर बिगुल आणि डोंग्या हे कुत्रे होते. गडावर जाण्यासाठी सुरुवात केली. डांबरी रस्त्यावरून चालत चालत गाव सोडले, पायवाट सुरु झाली.










(डोंग्या कुत्रा आमच्या पुढे, आम्हाल आता छायाचित्रातील वरील गडावर जायचे होते) 

पायवाट तुडवत पुढे सरकत होतो, शेखर ओरडला, घोरपड, घोरपड. डोंग्या व बिगुल पळत सुटले, आम्ही पण  पळत तिला बघायला गेलो, मात्र काटेरी झुडपात एका बिळात जावून गायब झाली.





डोक्यावर उन वाढत होते, अजून आम्हाला पेढा, मधला कड व शेवटी वैराड गड असा प्रवास करायचा होता. झाडाझुडपातून वाट काढत भराभर पावले टाकत होतो,  उनामुळे तहान लागत होती. ५ मिनिटे बसून १-२ घोट पाणी पिऊन रस्ता धरला.  चालत चालत पेढा येथे पोहचलो.















आता इथे वाजले होते दुपारचे १०.३०. हिरवा डोंगर चढत चढत मधेच काळाकुट्ट दगड लागला, तो पार करून जायचे थोडे टेन्शन होतेच, पण तोहि पार केला.





थोडा आराम केला, परत मधल्या कड्यावर जाण्यासाठी तयार झालो.  आडवा डोंगर चढत, मधेच लागणाऱ्या दगडी पायवाट, काटेरी झुडपे पार करत एका भल्या मोठ्या माळरानात आलो. वर निळे आकाश, तोंडातून आग ओकणारा सूर्यामुळे अंग घामाने चिंब झाले होते, अंगावरील  टी - शर्ट काढावेच लागले. या माळरानात इकडे तिकडे फिरत फोटो शूट सुरु केले.









आता लवकरच आम्ही गडावर पोहचणार होतो. १२.३० वाजता गडाच्या जवळ पोहचलो. काळ्या दगडांची तटबंदीत पण ढासळेला  गड दिमाखात उभा होता. गडाच्या पायाशी ६ पाण्याच्या टाक्या, पाणी बर्फासारखे थंडगार. इथे पोहचण्याचा आनंद होताच, पण थोडी भीती होती ती मधमाश्यांची, मधमाशांचे पोळे जागोजागी होते. साडूंच्या मागील अनुभवाप्रमाणे त्यांना मधमाश्यांनी हल्ला चढविला होता. आम्ही शांतपणे कुठलाही अतिरेक न करता  टाकीतील थंड पाण्याने हात पाय धुतले,  सर्व बाटल्या त्या पाण्याने परत भरून घेतल्या. हळू हळू गडाच्या २५ - ३० पायऱ्या चढत बुरुजावर उभे राहून जावली व वाई तालुक्यातील निसर्ग पाहण्यात गुंग झालो. 





बुरुजावरून उतरत परत गडाच्या १०-१२ पायऱ्या चढत होतो, घोड्यांच्या टाचा दगडावर स्पष्टपणे दिसत होत्या. निरीक्षण करत गडावर पोहचलो. समोरच भला मोठा हिरवागार परिसर, उजव्या बाजूस मारुतीचे छोटेसे मंदिर ४-५  पर्यटक सहज झोपू शकतात.  मंदिराची अवस्था बरी होती, मात्र डागडुजीची गरज होती,  मंदिरात प्रवेश केला, दगडात कोरलेली लाल रंगाची मारुतीची मूर्ती होती.  जवळच असलेल्या तेलाच्या बाटलीतून मारुतीच्या पायावर आम्ही एकएक करून  तेल सोडले,  मंदिरातील लाद्या खूपच थंड होत्या, पायांना आराम भेटत होता. पाया पडून थोडावेळ थंड लादीवर मांडी घालून बसून राहिलो.




मारुतीचे दर्शन घेऊन पुढे निघालो, मारुती मंदिराच्या उजव्यापासून चालायला सुरुवात केली. दोन छोटी तलाव लागले. डोंग्या व बिगुल तलावातील बेडूक पकडण्यासाठी तलावात उतरले, थोड थांबून परत पुढे चालू लागलो. एक हिरव्या पाण्याचे तलाव लागले. पांडवानी हे तलाव आपल्या हाताच्या नखाने खुरपुन बनविले होते, तलावाच्या चारही बाजूच्या दगडांवर नखाचे ओरखडे स्पष्ट दिसत होते. पाण्याच्या रंग पोपटी होता. द्रोपदी आपल्या लहान बाळांचे बालोती ह्या तलावात धूत असे म्हणून या पाण्याचा रंग पोपटी आहे, अशी आख्यायिका आहे. तलावाच्या बाजूलाच शंकराच्या मंदिरा जवळ आलो. दरवर्षी महाशिवरात्रीला इथे जत्रा असते. मंदिराची छान डागडुजी केली होती. जवळ जवळ ३० - ३५ लोक सहज राहू शकतात. मंदिरात विजेची  सोय आहे. गगनगिरी महाराजांचे शिष्य इथे वास्तव्यास असतात. आता मात्र कोणीही नव्हते. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भगवान शंकरांची सुंदर पिंडीवर आम्ही आणलेले बेलाची पानाने पूजा केली, पिंडीच्या उजव्याबाजूस गणेशाची मूर्ती होती. भिंतीवर गगनगिरी महाराजांचे फोटो होते. मंदिराच्या बाजूला एका पत्र्याच्या शेड मध्ये गुहा आहे, त्या गुहेमध्ये गगनगिरी महाराजांचे शिष्य तपस्या करतात. थोडे परत फोटो काढले.












पूजा आटपून, मंदिराचा फेरफटका मारला. मंदिराच्या उजव्या बाजूस असलेल्या, लोखंडी शिडीवर चढून एका छोट्या खिडकीत आता डोकावले, एक छोटाशी  खोली दिसली, आत गगनगिरी महाराजांचे पेंटीग होते, र्यापैकी प्रकाश होता. १०-१५ लोक आतमध्ये झोपू शकत होती. मंदिरा बाहेर पत्र्याने बंदिस्त खोली होती, झ्थे महाराजांचे शिष्य तपस्या करतात असे साडू म्हणाले. मंदिराचे निरीक्षण करत करत बाहेर पडलो, शूज घातले परत चालू लागलो, आता झ्थे दुपारचे २.३० वाजले होते. सर्वांना खूप भूक लागली होती. जवळच ऐसपेस झाड शोधू लागलो, भेटले. भाकरीचे गाठोडे कधी सोडतोय आणि कधी खातोय असे होत होते. शेवटी गाठोडे सोडले. 





गाठोडे सोडून झाले होते, तोंडाला पाणी सुटले. धीर नव्हता, तुटून पडलो. बिगुल व डोंग्याला १-१ भाकरी दिली.  गवतात बसून, झाडाच्या सावलीत मनोसक्त जेवणाचा आनंद लुटत होतो. पाण्याच्या टाकीतून आणलेले थंडगार पाणी पियालो, आता तृप्त झालो होतो.

क्रमश:


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्र..प्र..प्र..प्रबळगड

(भाग - १ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel. प्रशस्त.. प्रखर.. प्रभावशील..  असा हा प्रबळगड सर करण्याचा मनसुबा तयार केला. पनवेल पासून अवघे १३ किलोमीटर अंतरावर. हिरव्यागार रानवेलीत नटलेला, काळ्याकुट दगडांनी आच्छादलेला. त्यात वरुण राजाची कृपादृष्टी. हिरवेगार पठार, वाहणारे पानी, तर कुठे साठलेले पानी, वाट काढणारे झरे, उंचावरून कोसळणारे ते धबधबे. अशा या निसर्गाच्या कुशीत २ दिवस आम्ही १० जण होतो. त्याचाच अविस्मरणीय अनुभव शब्दात उतरविण्यासाठी आसुरलोय, माझा लेपटोप सुद्धा तयार आहे हा अनुभव टंकन करण्यासाठी… सुरु करतोय अगदी सुरुवातीपासून. या वेळेला टीम मध्ये,  मी ,  पपु काका  (टीम कर्नल),  पिल्या  (प्रेमाने त्याला सौरभ बोलतात),  अजिंक्य, मामा, ब्रम्ह काका, परेश . तर फ्रेशर होते  रोहित, बब्बू   आणि खास असा  प्रज्वल . (खास म्हणजे..  मुलान  दहावीला ९० टक्के पाडलान). मात्र पी.एस काका व आकाश काही.. यावेळेला नव्हते. त्यात आमचा सचिन पण गैरहजर...

भाग - २... सफर वैराडगडची..

भाग १ साठी इथे  टिचकी  मारा दुपारचे जेवण उरकले होते, थोडा वेळ झाडाच्या सावलीत पहुडलो. बाटलीतले पाणी संपले होते, मग सागर, संतोष आणि बिगुल पाणी आणायला परत टाकी जवळ गेले. मी, साडू, शेखर, मयूर व डोंग्या पुढे जाण्याचे ठरवले. आता आम्हांला गडावरील चोर खिंडीतून खाली उतरून जायचे होते. चोर खिंड खूपच निमुळती व थोडी खोल होती. शूज घालून उतरणे शक्यच नव्हते, सर्वांनी शूज काढून दगडांच्या खाचेत पाय रोवत, शरीर दगडावर घासत हळू हळू उतरून खाली आलो. शूज घालून परत पायवाट पकडली. थोडेच अंतर गेल्यावर लक्षात आले डोंग्या कुत्रा वरच राहिला. त्याला खिंडीतून खाली कसा आणायचा याचा विचार करत, त्याला हाका मारू लागलो , हा बहाद्दर कडच्या वरून आम्हांला पहात होता. साडू व संतोष त्याला घेण्यासाठी खिंडीच्या मागील बाजूने पायवाटेने जावू लागले, डोंग्या पण त्याप्रमाणे पुढे पुढे येत होता. शेवटी डोंग्यानेच पुढाकार घेऊन वाट काढत त्यांच्या जवळ आला. तोपर्यंत आम्ही बाकी एका भल्यामोठ्या दगडाच्या कोरीत आराम करत बसलो. आता आम्ही पूर्ण गड पार करून, एका भल्या मोठ्या माळरानात दाखल ...